शेतीकडे वळलेल्या एका अभियंत्याची गोष्ट

व्यवसायाने इंजीनिअर व कॉन्ट्रक्टर असलेले संतोष नारायण कदम मुळचे कसाल, ता.कुडाळ, जि.सिंधुदुर्ग इथले. कोरोना महामारीच संकट संपूर्ण जगावरच कोसळले आणि लॉकडाऊन सुरू झाला. तत्पूर्वी ते मुंबईहून सहकुटुंब माझ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कसाल या गावी आले होते. लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर दररोज टीव्ही पाहणे, थाळी वाजवणे, दिवे पेटवणे, पोलिस गाड्यांचे सायरन ऐकणे, स्पीकर वरील सूचना ऐकणे, जेवणावर मनसोक्त ताव मारणे यात बरेच दिवस गेले. दरम्यान तब्येतीकडे दुर्लक्ष होऊ लागले आणि नंतरचा  काळ मात्र अस्वस्थ करू लागला. काहीतरी केलं पाहिजे, सतत् धावपळ करत असणारा पिंड त्यांना शांत बसू देणार नव्हता, म्हणून विचारपूर्वक त्यांनी पावलं शेताकडे वळवली. शेतातील पाण्याची पाईप लाइन दुरुस्त करणे, कुंपण घालणे, झाडांना अळी करणे, खत घालणे, पाणी घालणे, नवीन लागवड करण्यासाठी खड्डे मारणे, कृषी संशोधन केंद्र वेंगुर्ले येथून झाडे आणणे इत्यादी कामे त्यांच्या नित्याची होऊ होऊ लागली. असं करता करता पुढे त्यांना वेळ पुरेनासा झाला. यानंतर जे झालं त्याने त्यांच्या आयुष्याचं चित्रच पालटलं.

‘सुरुवातीला मी एक प्रयोग म्हणून भाजीपाल्याची पेरणी केली, त्यात मुळा, लाल भाजी चवळी, पालक भाज्यांची पेरणी फक्त 30×30 एवढ्याच जागेत शेणखत लेंडी आदींचा वापर करून सुरुवात केली, आणि जेव्हा भर उन्हाळ्याच्या दिवसात ही भाजी रुजून त्यांचे अंकुर जमिनीच्या वर दिसू लागले त्यावेळी जो आनंद हा माझ्या आयष्यातील अनेक यश मिळवलेल्या आनंदा पेक्षा जास्त होता, तो होता स्वतःचा, शेतात राबून केलेल्या कष्टाचा… आणि त्याच वेळी एक संकल्प केला की यावर्षी संपूर्ण क्षेत्रात चांगली लागवड करून हिरवागार शालू त्या माझ्या शेतजमिनीला पांघरायला द्यायचा. माझ्या सोबतीस काम करत असलेल्या कष्टकरी तरुण मित्रांसोबत नवीन झाडांची लागवड, कुंपण, भाजी पाला पेरणी, खत घालणे आदी कामे मी सुरु केली.’

‘यामागचा एकच हेतू ध्यानात ठेवून भविष्यकाळातील परिस्थितीवर मात करायची असेल या संकल्पाची सुरवात मृग नक्षत्राच्या मुहूर्तावर त्याची  झाली पाहिजे असा माझा मानस होता. माझा हा प्रयत्न छोटासा असला तरी युवा पिढीला निश्चितपणे दिशा देणारा आहे, यातून अगदीच नाही तरी कोरोना पार्श्वभूमीवर मुंबईहुन परत गावाकडे वळलेल्या पन्नास टक्के तरुणांनी शेती कडे लक्ष दिले तर बेरोजगारीच्या खाईत लोटून वाम मार्गाकडे वळणारी पावले नक्कीच थांबतील.आणि सिंधुदुर्ग जिल्हयात एक नवी पहाट होईल ती हरित क्रांतीची जी मध्यंतरी थांबली होती. हा लॉकडाऊन काळातील  शेतीविषयक प्रवास मला बरच काही देऊन गेला फेब्रुवारी महिन्यात माझ्या रक्तातील Hba1c  10.8 असणारी साखरेची पातळी अवघ्या चार महिन्यात ती 6.2 वर आली जी माझ्या मागील वीस वर्षांत अनेक औषधें घेऊन सुद्धा आली नव्हती. सांगायचा मुद्दा हा की या लॉकडाऊन ने कदाचित आर्थिक स्तर उंचावला नसेल, पण अनुभवाचा, निसर्गाच्या सानिध्यातील अनुभूतीचा स्तर निश्चितपणे उंचावला आहे.’ (क्रमशः) 

संतोष कदम: 9422435855

Posted in: Uncategorized

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *