शेतीकडे वळलेल्या एका अभियंत्याची गोष्ट (भाग २)

बीज अंकुरे अंकुरे ओल्या मातीच्या कुशीत,

कसे रुजावे बियाणे माळरानी खडकात

लॉकडाऊननंतर ‘शेतीकडे पाऊल’ या संकल्पानंतर माझी शेतीकडे वळलेली पावलं छोट्या का असेना पण माझ्या हक्काच्या शेतात प्रत्येक दिवशी जायची. शेतीविषयक पूरक असे वेगवेगळे विषय घेऊन काहीतरी करायचं हा माझा दररोजचाच नित्यक्रम झाला होता. आणि त्यातूनच ‘पावसाळयातील भाजी’ ही एक संकल्पना घेऊन ती प्रत्यक्षात उतरविण्यासाठी त्याची सुरुवात मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यातच केली. अंदाजे ४ गुंठे म्हणजे ४००० चौरस फूट क्षेत्रात जमीन खोदून वाफे तयार करणे, तयार केलेले वाफे झाडाचा पालापाचोळा घालून जाळ करणे, ते शेणखत मिश्र करून बियाणे घालण्यासाठी खड्डे मारून ठेवणे आदी कामे पूर्ण केली, बाजारातून सर्व प्रकारची बियाणे आणून पावसाची प्रतीक्षा चालू होती पण बी पेरणी करण्यास योग्य असा पाऊसही पडत नव्हता म्हणून शेवटी १ जूनला सर्व तयार केलेले खड्डे आणि वाफे यात पेरणी केली, त्यामध्ये वेल असणारी पण मंडपाची आवश्यकता असणारी पडवळ, दोडके, कारले, वाल, काकडी, भोपळा, चिबुड,  सरळ वाढणारी चिटकी, भेंडी, मिरची, टोमॅटो, वांगी, मुळा, लाल माठ, मेथी आदी सर्व प्रकारची अशी विभागणी करून पेरणी केली.

पाऊस नसताना दोन दिवस पेरणी केलेल्या वाफ्यांना विहिरीच्या पाण्याने शिंपावे लागले. त्यानंतर थोडा-फार अधून-मधून पाऊस सुरू झाला आणि याच वेळी जमिनीच्या गर्भातून बीजं अंकुरायला सुरुवात झाली.  मित्रहो खरंतर मी शेतकरी नव्हतो अनुभव नव्हता. तरीसुद्धा प्रत्येक दिवशी सकाळी कुहूतलाने ते उगवलेले भाजीचे अंकुर बघण्याची उत्सुकता वेगळीच असायची. तो आनंद वेगळाच असायचा.  प्रत्येक दिवशी रुजलेल्या भाजीच्या अंकुराची वाढ ही पाहताना एक वेगळे समाधान मिळायचे. दहा दिवसानंतर रुजून आलेली वेगवेगळ्या प्रकारची भाजी आणि त्यानंतर पुढील संगोपन, त्याची वाढ होण्यासाठी फळधारणा होण्यासाठीचा काळ आणि त्यासाठी आवश्यक काम पुरेपूर करून त्यातून लक्षणीय उत्पन्न घेण्याचा माझा कल होता. यासाठी लागणारा खर्च आणि मिळणारे उत्पन्न याचाही अंदाज मी तयार ठेवला. आहे तेवढे उत्पन्न मिळालेच पाहिजे याकडे जोर होता. 

हे आपल्यासमोर मांडण्याचा एकच उद्देश म्हणजे पाऊस नुकताच सुरू झालाय. आणि म्हणून माझ्या तरुण मित्रांनो तुमच्या परसबागेत उपलब्ध जमिनीत अशा प्रकारे भाजी लावून उत्त्पन्न घेण्याचा निर्णय घ्या आणि यावर्षीची चतुर्थी सण या भाजी विक्री करून मिळालेल्या उत्पन्नात साजरा झाला पाहिजे असा संकल्प करा, नक्की यश मिळेल, मुंबईहून गावी आलेली आणि इथे स्थायिक असणारी तरुण मित्रांनी मनावर घेतले तर लॉक डाऊन च्या काळातील  झालेला आर्थिक तुटवडा या माध्यमातून भरून काढता येईल स्वयंपूर्ण होता येईल हे नक्कीच. आपल्या शेतात नैसर्गिक खतावर तयार झालेल्या भाजीचे स्टॉल प्रत्येक बाजारपेठेत दिसले पाहिजेत आणि बाहेरून येणाऱ्या भाजीवर अवलंबून न राहता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील माझ्या लाल मातीतील  स्वकष्टाने तयार झालेल्या भाजीची चव निश्चित वेगळी असेल.

संतोष कदम – 9422435855

Posted in: Uncategorized

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *