पोषणमूल्याच्या दृष्टीकोनातून शेवग्याच्या शेंगा आणि पाने यांच्याकडे नियमित आहार म्हणून फार कमी लोक वळतात. ज्यांना शेवग्याचे आणि त्याच्या पानांचे पोषणमूल्य ठाऊक आहे त्यांच्या आहारात शेवगा नियमित दिसून येतो. शेवग्याचा आहारात समावेश करणं अत्यंत आवश्यक आहे. ज्याप्रमाणे शेवग्याच्या शेंगा खाल्ल्या जातात त्यापेक्षाही कमी प्रमाणात त्याची पाने भाजी करून खाल्ली जातात. शेवगा हा ए, बी, सी जीवनसत्त्वे आणि फॉस्फरसचा अत्यंत भरीव स्रोत आहे.
ज्यांना थेट स्वरूपात याच्या शेंगा आणि पाने दुरापास्त आहेत अशा ग्राहकांकरता शेवग्यावर प्रक्रिया करून उत्पादने तयार करण्याची व्यवसाय संधीही आहे. शेवग्याची पाने आणि शेंगांपासून रस, भुकटी, तेल, टॅब्लेट्स आणि कॅप्सूल्सही तयार केल्या जातात.

आरोग्यदायी रस: शेवग्याच्या ताज्या पानांचा मिक्सरद्वारे रस काढून तसाच किंवा चवीसाठी लिंबू किंवा साखर घालून आरोग्यदायी पेय म्हणून विक्री करता येऊ शकते.
भुकटी: पानांना सावलीत वाळवून तिला बारीक दळून वेगवेगळ्या खाद्यपदार्थांमध्ये मूल्यवर्धक म्हणून वापर करता येतो. हवाविरहित साठवणूक केल्यास सहा महिने ही भुकटी टिकून राहू शकते.
तेल: शेवग्याच्या बियांचे तेल सौंदर्य प्रसाधनांमध्ये प्रामुख्याने स्किन क्रीम, आणि त्वचा संरक्षक म्हणून केला जातो. या तेलाचे खाद्यतेल म्हणून उपयोग तसेच औषधी उपयोगही आहेत.
टॅब्लेट्स किंवा कॅप्सूल्स: ज्यांना शेवग्याची चव आवडत नाही अशांसाठी टॅब्लेट किंवा कॅप्सुलच्या माध्यमातून पोषणतत्त्वे थेट घेता येऊ शकतात.