सीताफळाला ‘परीस स्पर्श’ करणारा प्रयोगशील शेतकरी – राजेंद्र ठोंबरे 

सुपरगोल्डन सीताफळ

खायला अतिशय गोड, बियांचं प्रमाण कमी, गर जास्त. हे फळ डोळा उघडल्यानंतर झाडावर १०-१२ दिवस राहतं आणि तोडलं कि पिकायला साधारण ८ दिवस लागतात. रोप लावल्यानंतर दोन वर्षाचं झालं कि जानेवारी ते जून काळात याला पाणी देण्याची चिंता नसते. पाण्याबिगर हे झाड तग धरून राहतं.  ‘सुपरगोल्डन’ जातीच्या सीताफळाच्या या वैशिष्ट्यांमुळे कोरडवाहू जमीन असलेल्या शेतकऱ्यांकडून याला विशेष मागणी आहे. टिकाऊपणामुळे ग्राहकांमध्ये हे लोकप्रिय तर आहेच पण व्यापाऱ्यांचीही या सीताफळाला विशेष पसंती आहे. सतत नवनवीन प्रयोग करून त्यातून उत्कृष्ट परिणाम साधत खामगाव, बार्शी (सोलापूर) येथील प्रयोगशील शेतकरी राजेंद्र ठोंबरे यांनी आपली तोट्यात जाणारी द्राक्षबाग काढून टाकत त्याजागी सुपरगोल्डन सीताफळाची शेती करून निराश झालेल्या शेतकऱ्यांना उमेद तर दिलीच पण आदर्शही घालून दिला.

सुमारे १० एकर जमिनीवर ९००० हजार सीताफळाच्या झाडांची त्यांनी लागवड केली असून. लागवडीच्या विशिष्ट पद्धतीमुळे त्यांच्या सर्व झाडांना समान आकाराची फळे येतात जे इतर शेतकऱ्यांना मात्र अजून शक्य झालेले नाही. याचे श्रेय ते आपल्या चुकांच्या केलेल्या दुरुस्तीला आणि सुधारणेला देतात. याच धैर्य, चिकाटी आणि जिद्दीमुळे कमी पाण्यात, कमी खर्चात आणि योग्य नियोजनाच्या जोरावर दहा एकर जमिनीच्या माध्यमातून त्यांनी यंदा ५६ लाखांचे उत्पन्न घेऊन दाखवले आहे.

सुपरगोल्डन सीताफळाला भरपूर मागणी असल्याचे राजेंद्र ठोंबरे सांगतात. मेट्रो सिटीमध्ये या फळाला किलोमागे १२५ ते २५० रुपयांपर्यत भाव मिळतो. सोबतच आमच्या नर्सरीमधल्या सुपरगोल्डन वाणाच्या रोपांनाही भरपूर मागणी आहे. ही रोपे संपूर्ण महाराष्ट्रासह आंध्रप्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, गुजरात, मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्त्तीसगड या राज्यांमध्ये जातात. आम्हाला जसा या व्हरायटीचा फायदा झाला तसाच तो इतरांनाही व्हावा म्हणून आम्ही ही रोपवाटिका सुरू केली आहे. इथून आम्ही उत्कृष्ट दर्जाची निरोगी रोपे माफक दरात सर्वसामान्य शेतकऱ्यांना उपलब्ध करून देतो. 

Posted in: Uncategorized

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *