येऊरचं जंगल वाचवण्यासाठी तरुणाईचा ‘ग्रीन गटारी’ उपक्रम

गेल्या काही वर्षात गटारी साजरी करणे म्हणजे शहराजवळ निसर्गरम्य वातावरणात, जंगल ओढे धबधबे अशा वाहत्या पाण्याजवळ जाऊन दारू पिणे, टोळक्याटोळक्यांनी जाऊन धांगडधिंगा घालणे, आणि त्याचे फोटो सोशल मिडीयावर ‘बघा आम्ही गटारी कशी साजरी केली’ अशा प्रकारे झळकावणे हा फंडा लोकप्रिय आहे. यामुळे शहराजवळच्या जंगलांना या बेजबाबदार प्रकाराचा मोठा फटका बसत असून प्लास्टिकच्या, दारूच्या बाटल्या, थर्मकोलसारखा निसर्गात विघटन न होणारा कचरा जंगलात इतस्ततः दिसून येतोय. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, त्याचीच ठाण्याकडील मागची बाजू असलेलं येऊरचं जंगल ह्या अनिष्ट प्रकाराला बळी पडत होतं. हे सगळं पाहून उद्विग्न होऊन वन्यजीव फोटोग्राफी करणाऱ्या काही तरुणांनी येऊरच्या जंगलासाठी सकारात्मक आणि विधायक काम करायला सुरुवात करायची या उद्देशाने ग्रीन गटारीची कल्पना अमलात आणायचे ठरविले. कसलाही पूर्वानुभव नसल्याने समविचारी संघटनांना एकत्र घेत ‘येऊर एन्व्हायर्नमेंटल सोसायटी’च्या बॅनरखाली स्वच्छता मोहिमेपासून सुरुवात केली. पाच वर्षापूर्वी सुरू केलेली ही ग्रीन गटारी मोहीम दरवर्षी उत्साहाने साजरी होतेय. 

५ वर्षांपुर्वी मात्र येऊरच्या जंगलात परिस्थिती गंभीर होती. जंगलाजवळ वाढणाऱ्या शहराला  कसलाही पायबंद नसल्यामुळे जंगलात मिळेल तिथून लोकं आत घुसायचे. विकेंडला खाणंपिणं, मौजमजा करायला हक्काचं ठिकाण बनल्याने येऊरच्या जंगलामध्ये जाणाऱ्या प्रत्येक पायवाटेच्या बाजूला,मोकळ्या जागेत भयंकर प्लास्टिकचा, थर्माकोलचा कचरा जमा व्हायचा. पावसाळ्याच्या चार महिन्यात तर येऊर परिसरात हुल्लडबाजीला ऊत यायचा. जंगलभर विखुरलेलं प्लास्टिक ,दारूच्या बाटल्यांचे तुकडे यामुळे इथल्या वन्यजीवांच्या अस्तित्वाला मोठा धोका निर्माण झाला होता. सरपटणारे जीव या काचांचा शिकार बनत होते. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी कोणीच काहीच करत नव्हते. 

येऊर एन्व्हायरमेंट सोसायटीच्या सातत्यपूर्ण प्रयत्नानंतर, पाच वर्षांनी येऊरच्या जंगलाच्या परिस्थितीत अभूतपूर्व सुधारणा झाली असून जंगल परिसरात  प्लास्टिक किंवा बाटल्या अभावानेच दिसतात. पोलिसांच्या कारवाईच्या धडाक्यामुळे गटारीनिमित्त जंगलात पार्ट्या झोडायला येणाऱ्या हजारो पर्यटकांची १००% नाकाबंदी झाली आहे. जंगलात अविघटनशील कचरा जमण्याचं प्रमाण लक्षणीयरित्या कमी झालंय. पार्ट्या बंद झाल्याने जंगलात पुन्हा एकदा नैसर्गिक शांतता नांदू लागलीय म्हणून सजीवसृष्टी आनंदात आहे, याचं अतीव समाधान येऊर एन्व्हायरमेंट सोसायटीच्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर दिसून येतंय. अशा प्रकारचे उपक्रम YES नियमीतपणे करत असतं. या कार्यक्रमांना जनसहभागाची गरज असतेच. येऊर एन्व्हायरमेंट सोसायटीच्या निसर्गविषयक कार्यक्रमांमधे जरुर सहभागी होण्याचं आवाहन संस्थेचे समन्वयक रोहीत जोशींनी केलंय. YES च्या ग्रीन गटारीपासून स्फूर्ती घेऊन जागोजागी पर्यावरणपूरक ग्रीन गटाऱ्या साजऱ्या होतील.

(येऊर एन्व्हायरमेंटल सोसायटीचा संपर्क क्रमांक – 9819769069)

Posted in: Uncategorized

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *