वन्यप्राण्यांसाठी शेती करणारा अंबरनाथचा अवलिया

गेल्या हिवाळ्यात ठाणे जिल्ह्यातल्या अंबरनाथ-बदलापूर आणि आसपासच्या परिसरात ताजी स्ट्रॉबेरी अनेकांना अगदी माफक दरात खायला मिळाली. त्यावेळी इतकी स्वस्त आणि ताजी स्ट्रॉबेरी बाजारात पाहून अनेकांच्या भुवयाही उंचावल्या होत्या. ‘स्ट्रॉबेरी तेही आर्द्र वातावरणात ? कसं शक्य आहे ?’, असा प्रश्न बऱ्याच जाणकारांनाही पडला होता. मुळात तुमच्याकडे काहीतरी नवं करण्याची आणि लोकांना, समाजाला आणि निसर्गाला मुक्तपणे देण्याची दानत हवी. ती असली कि ते प्रत्यक्षात आणायला फक्त कृती करावी लागते. गेल्यावर्षी स्ट्रॉबेरीमुळे चर्चेत असलेले प्रयोगशील शेतकरी अनुभव मांजरेकर यंदा त्यांच्या ‘देणे निसर्गाचे’ या निसर्गाप्रति वाहिलेल्या अनोख्या उपक्रमामुळे वाखाणले जातायत. जंगलातील आदिवासींच्या मदतीने जंगलामध्ये वन्यप्राण्यांना फळांची उपलब्धता व्हावी आणि येथील वन्यप्राण्यांची वर्दळ पुन्हा वाढावी या उद्देशाने त्यांनी २ हजार फळझाडांची लागवड केली आहे. पावसाळी वातावरणात तग धरू शकणाऱ्या तब्बल दहा हजार फळबिया त्यांनी बदलापूर-पनवेल पट्ट्यातल्या डोंगररांगेत रुजवल्या आहेत.

या उपक्रमाबद्दल अधिक सांगताना ते म्हणाले –

‘देणे निसर्गाचे…’या उपक्रमाचा हेतू हा जंगल वाफसा वाढवणे हा आहे. ‘वाफसा’ म्हणजे पहिला पाऊस पडल्यावर जमिनीत निर्माण होणारी ऊब. ही ऊब झाडे लावल्याने अधिकाधिक वाढते. गेली वीस वर्षे मी आदिवासींच्या सोबत जंगल भटकंती करत आहे. दक्षिणेकडील पर्वत रांगा फिरल्यावर आणि वन्यजीवन अनुभवल्यावर आपल्याकडे असे का होऊ शकत नाही? असा प्रश्न सतत मनात येत होता. आदिवासी मुळात शिकार करून शेती करुन पोट भरतात. पण कोळश्याच्या प्रचंड मागणीमुळे जंगलतोड होत राहीली. त्यामुळे गेल्या काही वर्षात टाहुली ते चंदेरी पर्वत रांग ही पनवेल आणि बदलापुरच्या बाजूने ओकीबोकी आणि भकास दिसू लागली. मातीची धूप होऊन डोंगर खचलेले दिसू लागले. रानडुकरे, भेकर,साळींदर हे कमी होऊ लागले. यामुळे आदिवासी धास्तावले. मग मी कल्पना त्यांच्या समोर मांडली की रानडुकरे भेकरं तेव्हा वाढतील जेव्हा त्यांना खायला मिळेल, आसरा मिळेल. ही कल्पना त्यातल्या काहींना पटली आणि मग त्यातले काही जण तयार झाले. 

भविष्यातल्या उपक्रमांविषयी ते म्हणतात –

‘भविष्यात पुढील १२ वर्षे कमीतकमी सलग झाडे, झुडपे लावायचा माझा मानस आहे. जंगलातच सापडणाऱ्या साधनांनी नाला बंडींग करुन वाळा, गवती चहा, सिट्रोनेला या मातीची धूप थांबवणाऱ्या झुडूप वर्गातील वनस्पतीसुद्धा लावायला विचार आहे, जेणेकरून डोंगरावर पाणी जिरेल.  धावणारे पाणी थांबवा आणि थांबलेले जिरवा या तत्त्वाने गावातील कुपनलिका, विहीर याची पाण्याची पातळी वाढेल. वन्यजीव, वनौषधी, वन्य झाडे ही एकमेकांना पुरक आहेत आणि मनुष्य प्राणी हा त्याचाच एक भाग आहे. तो हिसकावून न घेता त्याचा भाग होऊन जगणे मानवाला फायद्याचे तर आहेच शिवाय आपण निसर्गातून घेतो ते त्याचं देणंही लागतो. हा आर्तभाव फार महत्वाचा आहे, नाहीतर तो आपल्याला माफ करणार नाही.’

Posted in: Uncategorized

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *